पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्याचे सर्वाधिकार अजित पवार यांना देण्याचा ठराव शहर पदाधिकार्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष तसेच प्रदेश प्रतिनिधी यांची नावे निश्चित करण्यासाठी पदाधिकार्यांची बैठक निसर्ग मंगल कार्यालय येथे पार पडली. त्यामध्ये पवार यांना अधिकार देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांची राज्यसभेवर फेरनिवड झाल्याने त्यांच्याकडे गेल्या साडेआठ वर्षांपासून असलेल्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहणार का? या विषयी चर्चा सुरू होती. त्यातच दोन आठवड्यापूर्वी अजित पवार यांनी शहराध्यक्षपदासाठी नवीन चेहर्याला संधी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शहराध्यक्ष बदलणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.