मुंबई-मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या सिंचन घोटाळ्याला तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार जबाबदार असल्याचे एसीबीने सांगितले आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष राजकारण करत असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपावर केले आहे. दरम्यान विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकार सूडबुद्धीने कारवाई करत नसून एसीबी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरु आहे. संबंधित यंत्रणांवर कोणताही दबाव नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. चौकशीशिवाय अजित पवारांना तुरुंगात टाकावे अशी इच्छा आहे का?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला आहे.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टात दाखल झालेल्या दोन जनहित याचिकांच्या सुनावणीत एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. घोटाळयास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला होता. यावरुन विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. निवडणुकीच्या तोंडावर हा त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भुजबळांनी केला होता. तर धनंजय मुंडे यांनी देखील सरकार या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचे सांगितले होते.
विरोधकांच्या या आरोपांवर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘सिंचन घोटाळ्याची चौकशी एसीबीमार्फत सुरु असून चौकशीत पारदर्शकता आहे. एसीबीने ही कारवाई केली असून त्यांना चौकशी करण्याचे अधिकार आहेत. आम्ही कोणत्याही तपास यंत्रणेवर दबाव टाकलेला नाही. निवडणूक किंवा अधिवेशन डोळ्यासमोर ही कारवाई करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजून अनेक प्रकरणं बाहेर येणे बाकी असून जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा होणारच असे त्यांनी सांगितले.