अजित पवार यांच्या भेटीने कार्यकर्त्यांना स्फूर्ती

0

पिंपळे गुरव येथील आढावा बैठकीत संवाद साधत दिला कानमंत्र
आमदार जगताप यांना रोखण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार

नवी सांगवी : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता आढावा बैठकीच्या निमित्ताने पिंपळे गुरव येथे येऊन परिसरातील कार्यकर्त्यांशी नुकताच संवाद साधत काही कानमंत्र दिले. यानंतर माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पिंपळे गुरव येथे आयोजित केलेल्या कीर्तन सप्ताहास हजेरी लावली.तसेच युवा कार्यकर्ते शाम जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन संवाद साधत आवर्जून त्यांची विचारपूस केली. तसेच कोणाच्याही दहशतीला घाबरायचे नाही मी तुमच्या पाठीशी आहे,असा शब्द दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून येणार्‍या काळात एकजुटीने व आधिक जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी काम करू व स्वत:च्या स्वार्थापोटी बेईमानी करणार्‍यांना पराभवाची धूळ चारू असा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला आहे.

हल्लाबोल नियोजनासाठी बैठक
विकासकामे करूनही 2017च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव अजित पवार अद्याप विसरलेले नाहीत. त्यामुळे नव्या दमाचे कार्यकर्ते पुढे आणण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा 10 जूनला पुण्यात होणार आहे. त्या निमित्ताने सभेच्या नियोजनासंदर्भात तसेच पक्षाच्या आगामी ध्येयधोरणाबाबत माहिती देण्यासाठी अजित पवार यांनी नुकताच पिंपरी चिंचवड शहराचा दौरा करून तिन्ही विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

भाजपा नेत्यांच्या मांडल्या चुका
पिंपळे गुरव येथील निळु फुले नाट्यगृहात आयोजित बैठकीत अजित पवार यांनी विरोधकांच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र शब्दात हल्ला चढविला. दरम्यान यावेळी उपस्थित असलेल्या माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, शिवाजी पाडुळे आदींनी आपल्या मनोगतातून महापालिका प्रशासनाच्या व शहरातील भाजपा नेत्यांच्या चुकीच्या कामांचा पाढा अजित पवारांसमोर वाचला. राजेंद्र जगताप यांनी तर भाजप नेते परिसरातील अवैध कामांना प्रोत्साहन देत असल्याची तक्रार करत सामान्य नागरिक दहशतीखाली असल्याचा आरोप केला. याचा संदर्भ घेत आपल्या शैलीत अजित पवार म्हणाले की, कोणाच्या दहशतीला घाबरण्याचे अजिबात कारण नाही, अरे ला कारे आणि आमचा नाद करायचा नाही असे म्हणायचे असा सल्ला त्यांनी दिला.

पालिकेतील अपयशाने खचू नका
कार्यकर्ता बैठकीनंतर अजित पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने व अन्य सहकार्‍यांसमवेत शाम जगताप यांच्या घरी जाऊन रात्रीचे भोजन केले. यामुळे शाम जगताप व त्यांच्या कुटुंबियांनी अजित पवार यांना धन्यवाद दिले. गत महापालिका निवडणुकीत शाम जगताप यांनी सुमारे साडे नऊ हजार मते मिळवून भाजपा उमेदवाराला जोरदार टक्कर दिली होती. यामध्ये पराभव झाला असला, तरी त्यांनी घेतलेले मताधिक्य नागरीकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार जगताप यांच्या बालेकिल्ल्यात शाम जगताप,तानाजी जवळकर, अमरसिंग आदियाल, शिवाजी पाडुळे,गौरव टण्ण् अशा नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे. या कार्यकर्त्याशी वैयक्तिक संवाद साधताना पवार यांनी अपयश मिळाले म्हणून खचू नका, चुका दुरुस्त करून अंग झटकून कामाला लागा, असा कानमंत्रही कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे ‘ आता कस अजितदादा म्हणतील तस’ असा नारा देत कार्यकर्त्यांनीही अजितदादांशी प्रामाणिक राहण्याची जणू शपथ घेतली आहे.त्यामुळे अजित पवार यांच्याशी घेतलेला ‘पंगा’ शहरातील भाजपा नेत्यांना कितपत जड जाणार हे आगामी काळात शहरवासीयांना दिसून येईल.