मुंबई: आज सकाळी भाजपा, राष्ट्रवादी पक्ष मिळून सत्तास्थापन करण्यात आली आहे. राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आज सकाळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजीत पवार यांनी शपथ घेतली. या राजकीय घडामोडी नंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिकिया व्यक्त करत अजीत पवारांनी शरद पवारांना दगा दिला असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी हा निर्णय एकट्या अजित पवारांचा असल्याचे सांगितले. यामुळे पुन्हा एकदा अजित पवार, शरद पवार यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहे.
या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण अजित पवार यांनी जे केलं त्याबद्दल अनभिज्ञ असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी जे काही केलं ते त्यांचं वैयक्तिक मत असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसंच यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर काही वेगळ सांगायला नको असं म्हटलं होतं. परंतु शरद पवार यांच्या माहितीनंतर तेदेखील यापासून अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.