अजीत डोवाल भेटले अमेरिकेच्या संरक्षण सचिवांना

0

वॉशिंग्टन । राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या संरक्षण सचिव जेम्स मॅटीस यांची शनिवारी भेट घेतली. भारत-अमेरिकेमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचे समजते. यावेळी त्यांनी मॅटीस यांच्या व्यतिरिक्त होमलँडचे संरक्षण मंत्री जॉन कॅली व अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅकमास्टर यांचीही भेट घेतली.

जगावरील दहशतवादाचा धोका वाढत असून दक्षिण आशियातील दहशतवादाच्या समस्येचा सामना करण्यासाठी भारताच्या सहकार्याने प्रभावी मार्ग निघू शकतो, अशी चर्चा यावेळी त्यांच्यात झाली. दक्षिण आशियाई भागात भारताकडून राबावण्यात आलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेची मॅटिस यांनी प्रशंसा केली. यावेळी त्यांच्यात जमीन व समुद्री मार्गाने पसरणा-या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सहकार्यात वाढ करण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली, अशी माहिती पेंटागनचे प्रवक्ते जॅफ डेव्हिस यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यापासून अजीत डोवाल यांचा अमेरिकेचा दुसरा दौरा आहे. याआधी डोवाल यांनी डिसेंबर महिन्यात अमेरिकेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लिन यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी डोवाल यांनी रिपब्लिकन सिनेटर आणि आर्म्ड सर्व्हिस समितीचे प्रमुख जॉन मॅक्वेन आणि सिनेटर रिचर्ड बर यांच्याशी चर्चा केली. हे दोन्ही सिनेटर ट्रम्प यांचे विरोधी म्हणून समजले जातात.