अजुनही 40 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत

0

पुणे । अकरावी प्रवेशाच्या दोन फेर्‍या पूर्ण झाल्या असल्या तरीही अद्याप जवळपास 40 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. दुसर्‍या फेरीअंतर्गत प्रवेशासाठी 24 हजार विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केली होती. मात्र, त्यातील साडेदहा हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. त्यामुळे 78 हजार अर्जांपैकी पहिल्या व दुसर्‍या फेरीत मिळून साधारण 35 हजार प्रवेश पूर्ण झाले आहेत.

6 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सोमवारी पूर्ण झाली. या फेरीत 24 हजार 536 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी केवळ 10 हजार 531 विद्यार्थ्यांनी पूर्ण शुल्क देऊन आपला प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 6 हजार 884 इतकी होती. त्यापैकी 5 हजार 333 विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तर 1 हजार 517 विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत लॉक झाले असून त्यांचा विचार आता चौथ्या फेरीनंतर करण्यात येणार आहे.

56 हजार जागा रिक्त
पहिल्या व दुसर्‍या फेरीत मिळून साधारण 35 हजार प्रवेश पूर्ण झाले आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अद्यापही जवळपास 40 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. तर अजुनही 56 हजार जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.

योग्यतेनुसार मिळणार महाविद्यालय
विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. दुसर्‍या यादीनंतरचे महाविद्यालयांचे कट ऑफ संकेतस्थळावर जाहीर केले आहेत. ते पहावेत व त्यानुसार जर पसंतीक्रम बदलायचे असतील तर ते बदलू शकतात. त्यासाठी गुरुवारी (27 जुलै) शेवटची तारीख आहे. विद्यार्थ्यांनी कट ऑफ पाहून महाविद्यलायांची नावे टाकली असतील तर निश्चितच त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार महाविद्यलाय मिळेल.
-मिनाक्षी राऊत, सचिव, अकरावी केंद्रीय प्रवेश समिती

एकूण प्रवेश क्षमता 91,670
एकूण आलेले अर्ज 78438
पहिल्या फेरीत झालेले प्रवेश 24663
दुसर्‍या फेरीत झालेले प्रवेश 10531