शिरपूर। मुंबई – आग्रा महामार्गावरील हाडाखेड आरटीओ तपासणी नाक्यावरच चोरी होण्याचा प्रकार घडला आहे. या ठीकाणी चोरट्याने तीन संगणक संच लंपास केले असून याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर राज्य सीमेवर प्रादेशिक परिवहन अर्थात आरटीओचा तपासणी नाका आहे. या नाक्यावर 17 रोजी ही चोरी झाली. काल सकाळी 8.30 वाजेला नाक्यावरील कर्मचारी आले असता कॅबिनमधील कॉम्प्युटर संच चोरण्यात आल्याचे यांना लक्षात आले. याबाबत येथील नियुक्त कर्मचारी गौतम सदाशिव सोनवणे (32) रा. पाचोरा ह.मु. हाडाखेड तपासणी नाका, शिरपूर यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, 53 हजार 753 रुपये किंमतीचे 3 कॉम्प्युटर सीपीयु आणि बारकोड प्रिटर चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.