भुसावळ/जळगाव : अज्ञाताने शेतकर्याच्या शेतातील घराला आग लावल्याने दोन लाखांचे नुकसान झाले. या आगीत संसारपयोगी साहित्यांसह कापूस, तूर आदी वस्तू जळून खाक झाल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञातांचा पोलिसांकडून शोध
गणेश पुंडलिक ठाकरे (रा.वाल्मिक नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. शिरसोली येथे त्यांची शेती असून शेताच्या बाजूलाच राहण्यासाठी घर आहे. त्याठिकाणी गणेश ठाकरे यांचे आई-वडील राहतात. गणेश ठाकरे यांच्या भावाचे गुरुवार, 17 मार्च रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने आई-वडील हे जळगावात आल्याने शिरसोली येथील घर बंद होते. यादरम्यान बुधवार, 23 मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास रोजी अज्ञात व्यक्तींनी शिरसोली येथील शेतालगत असलेल्या घर पेटवून दिले. ठाकरे यांच्या शेतालगत असलेल्या शेजारच्या शेतकर्याने ही घटना फोनवरुन गणेश ठाकरे यांना कळविली. त्यानुसार ठाकरे यांनी तत्काळ शिरसोली गाठले व आग विझविण्याचा प्रयत्न केला.
शेतकर्याचे दोन लाखांचे नुकसान
आगीत घरातील एक लाख 10 हजार रुपये किंमतीचा 14 क्विंटल कापूस, 10 हजारांची दोन क्विंटल तूर, 20 हजारांची पाण्याची मोटार व संसारोपयोगी साहित्य मिळून दोन लाखांचे साहित्य आगीत खाक झाले. या प्रकरणी गणेश ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत.