A young computer engineer was killed in a collision with an unknown vehicle near Bambori जळगाव : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. बांभोरी गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला. याबाबत पारधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोकुळ रामदास फुसे (40, रा. शिरसोली, ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
नाशिकहून परतताना अपघात
गोकुळ फुसे हा कम्प्युटर अभियंता असून खाजगी ठेकेदार घेऊन काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. याच कामाच्या निमित्ताने गोकुळ फुसे हा दुचाकीने नाशिक येथे गेला होता. नाशिकहून काम आटोपून जळगावकडे परतत असताना सोमवार, 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास बांभोरी गावानजीक अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
पाळधी पोलिसात नोंद
अत्यवस्थ अवस्थेत तरुणास जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यासंदर्भात पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली.