लोणावळा : जुना पुणे मुंबई हायवे रोडवरील वरसोली टोलनाका येथे पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणार्या मार्गावरील रस्ता दुभाजका जवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका पादचारी युवकाचा मृत्यू झाला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास वरसोली टोल नाक्याजवळ सदर घटना घडली. सदर घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे, उंची अंदाजे 5 फुट, अंगाने सडपातळ, अंगावर पूर्ण बाहयाचा पांढरे रंगाचा शर्ट आणि त्यावर लाल रंगाचे टिपके, निळे रंगाचा आणि त्यावर अमेरिका या देशाचा राष्ट्रध्वजाचा चिन्हं असलेला हाफ बरमुडा असे वर्णन आहे.याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अपघातास कारणीभूत असणारे वाहन तसेच वाहन चालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधित युवकाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रनसौरे हे करीत आहेत.