जळगाव – दुचाकीने सोयगावकडून जळगावकडे येत असतांना नेरीरोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तीचा गुरूवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत शहर पोलीसात शुन्य क्रमांकाने आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, संजय राजाराम बारी (वय-45) रा. चिंचपूरा गल्ली, पिंप्राळा हे काही कामानिमित्त सोयगावला गेले होते. काम आटोपून रात्री 10.30 वाजेच्या सुमारास परतत दुचाकीने परतत असतांना नेरीरोडवर समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 108ने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. गुरूवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा असा परीवार आहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.