अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

0

नगरदेवळा – नगरदेवळा स्टेशन रोड लगत पेट्रोल पंपाजवळ 12 एप्रिल रोजी रात्री साडे आठ दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर अज्ञात वाहन चालक विरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगरदेवळा येथिल भरत बापू न्हावी (वय-19) हा युवक पायी फिरण्यास जात असतांना त्यास नगरदेवळा स्टेशनकडून येणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिली व वाहनचालक पसार झाला. त्याला तात्काळ प्रवासी वाहतूक करणार्‍या गाडीने भडगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डोक्याला जबर दुखापत होऊन रक्तश्राव झाल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी भरत यास मृत घोषित केले. मयताचा भाऊ याने पाचोरा पोलिसात फिर्याद दिल्याने अज्ञात वाहन चालक विरोधात गु.र.नं. 43/2018 भादंवि कलम 304 अ, 279, 338, 134 ब, मोटर वाहन कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप सह नगरदेवळा दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत. त्याच्यावर आज रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील कर्ता युवक गेल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.