अज्ञात वाहनाच्या धडकेत पित्याचा मृत्यू ; मुलगा गंभीर जखमी

महामार्गावर अपघातांचे सत्र कायम : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. मंगळवारी पुन्हा भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने फुलगावच्या वयोवृद्ध पित्याचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला. अपघातप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. समांतर रस्त्यांअभावी अपघात होत असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आतातरी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

फुलगावच्या वयोवृद्धाचा मृत्यू
मंगळवारी नेर शाहापूर, जि.बर्‍हाणपुर येथील मूळ रहिवासी नामदेव हरी प्रजापती-कुंभार (70, सध्या रा.फुलगाव) व त्यांचा मुलगा रामकृष्ण नामदेव प्रजापती-कुंभार (28) हे त्यांच्या शेतात हतनूर धरणाची माती टाकल्याने जेसीबी मशीन चालकास पैसे देण्यासाठी जाडगाव येथे दुचाकी (एम.पी.12 एम.एच.3936) ने आले होते. परतीच्या प्रवासात फुलगाव येथे येत असताना रेल्वे उड्डाण पुलाजवळ मागुन येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने पिता-पूत्र फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवते असता डॉक्टरांनी नामदेव प्रजापती यांना मृत घोषीत केले तर रामकृष्ण प्रजापती हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

अज्ञात वाहन चालकाचा शोध
अपघात प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात रामकृष्ण प्रजापती यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल नावेद अली पठाण करीत आहेत. दरम्यान, वरणगाव पोलिसांकडून अज्ञात वाहनधारकाचा शोध सुरू करण्यात आला आहे.