मुक्ताईनगर : मुक्ताईनगरपासून जवळच असलेल्या पिंप्री अकराऊत येथील यात्रेतून परतत असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीतील कर्मचार्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सहकारी कर्मचारी गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवार, 22 मार्च मध्यरात्री 1 ते 1:30 वाजेच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील खडसे पंपासमोर घडला. रत्नदीप विजय कोचुरे (35, मूळ रा.जळगाव, ह.मु.मुक्ताईनगर) असे ठार झालेल्या कर्मचार्याचे नाव आहे तर या अपघातात संजय विश्वनाथ सोनार (45, मुक्ताईनगर) हे गंभीर जखमी झाले असून जळगाव येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यात्रोत्सवातून परतताना गाठले मृत्यूने
मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकराऊत येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा पाहण्यासाठी मुक्ताईनगर नगरपंचायतीचे कर्मचारी रत्नदीप कोचुरे व संजय सोनार हे दोन्ही दुचाकीने सोमवारी रात्री गेले होते मात्र परतीच्या प्रवासात मंगळवारी मध्यरात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासमोर एका अज्ञात वाहने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली व धडकेत रत्नदीप कोचुरे हे जागीच ठार झाले तर संजय सोनार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जळगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कर्मचारी वर्गातून हळहळ
रत्नदीप कोचुरे यांचा अपघाती मृत्यूनंतर मुक्ताईनगर नगरपंचायतीतील कर्मचार्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. हसतमुख व मनमिळावू असलेला कर्मचारी रत्नदीप कोचुरे यांच्या मृत्यूची वार्ता वार्यासारखी पसरताच शहरातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. मयत रत्नदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परीवार आहे.