अज्ञात शरद जोशी लोकापर्यंत पोहोचवणे ही प्रेरणा

0

पुणे : महापुरुषाच्या कर्तृत्वाचा वेध इतिहास घेत असतोच, पण त्याच्यामधील माणसाचा शोध घेणे, त्याचे गर्दीतील एकटेपण, भावभावना, संवेदनशीलतेचा शोध घेणे हा साहित्याचा विषय असतो. वक्ता, लेखक, साहित्याचे अभ्यासक असे शरद जोशींच्या व्यक्तिमत्त्वाचे अज्ञात पैलू लोकांपर्यंत पोहोचावे ही या लिखाणामागची प्रेरणा होती असे मत लेखिका वसुंधरा काशीकर यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे बुक फेअर यांनी आयोजित केलेल्या ‘शरद जोशींना समजून घेताना’ या मुलाखतीत त्या बोलत होत्या. प्रा. भक्ती हुबळीकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. डॉ.मिलिंद जोशी, पी.एन.आर. राजन व दीपक करंदीकर उपस्थित होते. ‘शरद जोशी… शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या पुस्तकाचा उद्देश ‘अज्ञात’ शरद जोशी लोकांपर्यंत पोहोचवणे हा होता, असे काशीकर म्हणाल्या. वसुंधरा म्हणाल्या की, शरद जोशी हे तत्त्वचिंतक नेते होते. स्वातंत्र्य हा त्यांच्या सर्व चिंतनाचा आधार आहे. आयुष्यात जास्तीत जास्त निवडीची संधी असणे म्हणजे समृद्ध जीवन अशी त्यांची मांडणी आहे. निवडीचे आणि पर्यायाचे स्वातंत्र्य म्हणजे इंडिया आणि हे स्वातंत्र्य नसणे म्हणजे भारत अशी ‘भारत-इंडिया’ मांडणी त्यांनी उलगडून दाखवली. खुल्या व्यवस्थेची त्यांची मांडणी तुम्हाला समर्थनीय वाटते का? यावर काशीकर यांनी स्पर्धेतून ग्राहकांचा फायदा होत असल्याचे पटवून दिले. खुली व्यवस्था म्हणजे चंगळवाद नाही असे सांगून त्यामागील अर्थशास्त्रीय विचार स्पष्ट केला.
कमी काळात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आली. शेतकरी वाचकांपेक्षा ललित साहित्याच्या मध्यमवर्गीय वाचकाला हे पुस्तक भावले, 24 वर्षाच्या अमेरिकेतील तरुणापासून तर 85 वर्षाच्या वृद्धापर्यंत अनेकांनी हे पुस्तक आवडल्याचे कळवले. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.