Three accused in the case of illegal tree felling escaped from the custody of the forest department : a shocking incident in Yawal City यावल : यावल तालुक्यातील पूर्व वन विभागात वृक्षतोड करून वनसंपत्ती नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटकेतील त्रिकूटाने यावल पोलिस ठाण्याच्या परीसरातून पळ काढल्याने वनविभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोपींची वैद्यकीय चाचणी करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वीच ही घटना बुधवार, 12 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील वन विभागाच्या पुर्व पेझरपाळा या कंम्पाडमेंट (कक्ष) क्रमांक 79 व 80 मधील वनक्षेत्रात अवैधरीत्या मौल्यवान वृक्षांची तोड करताना संशयीत बिलालसिंग पावरा, प्यारासिंग पावरा व सुरेश पावरा यांना अटक करण्यात आली. बुधवार, 12 ऑक्टोंबर रोजी संशयीतांना भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर वैद्यकीय चाचणी यावल ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास करण्यात आली व आरोपींना अटकेची प्रक्रिया सुरू असताना आरोपींनी यावल पोलिस ठाण्याच्या आवारातून पळ काढला.
संशयीतांविरोधात यावल पोलिसात गुन्हा
यावल वन विभागातील पूर्व क्षेत्राचे वनपरीक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी या घटनेला दुजोरा दिला. पसार झालेल्या तिघा आरोपींच्या शोधकामी वेगवेगळी पथकेसातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात रात्रीच पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. पसार झालेल्या सर्व आरोपींविरूद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी दिली.