अटकेत असलेल्या आरोपीचा घरी मुक्काम

0

नंदुरबार । सोलापूर जेलमधे असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपीचा मुक्काम एका बहुचर्चीत महिलेच्या घरी सोलापूर पोलिसांनी घडवला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी नंदुरबारला आणण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा प्रकल्पांतर्गत येणार्‍या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत सुमारे 8 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून याबाबत प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ तसेच सहायक प्रकल्पाधिकारी विष्णू दळवी यांच्याविरुध्द गुन्हे दाखल असून ते सध्या अटकेत आहेत. त्यातील विष्णू दळवी या आरोपीची रवानगी सोलापूर जेलमधे करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी 3 जुलै रोजी दळवी याची नंदुरबार न्यायालयात सुनावणीची तारीख होती.

पोलीसांनी मुक्काम घडविले?
सोलापूर पोलिसांनी त्यास एमएच 13 बीएन 7728 या क्रमांकाच्या खाजगी वाहनातून नंदुरबारला आणले. मात्र न्यायालयात हजर करण्याच्या दरम्यानच्या कालावधीत आरोपीला घेऊन आलेले पोलिस आणि आरोपी यांचा नंदुरबार शहरातील श्रीराम नगरात राहणार्‍या एका बहूचर्चीत महिलेच्या घरात मुक्काम होता, असे काहीजणांना आढळून आले. याची कुणभूण एकलव्य आदिवासी क्रांतिदलाच्या कार्यकर्त्यांना लागताच त्यांनी श्रीराम नगरमधे जाऊन खात्री केली.

सोलापूरात मुक्काम
या भागात गर्दी जमताच उपनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक रणदिवे यांनी पथकासह त्या महिलेच्या घरी धडक मारली. यावेळी तो आरोपी आणि पोलिस कर्मचारी यांचा नाश्ता सुरु होता. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपनगर पोलिसांनी त्या आरोपीला व सोबत असलेल्या सोलापूर पोलिसांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. नियमानुसार आरोपीचा संबंधीत जेल ते संंबंधीत न्यायालय एवढीच ने आण पोलिसांनी करणे बंधनकारक आहे.

अहवाल पाठविणार
तथापि सोलापूर पोलिसांनी मात्र या नियमाबाहेर जाऊन वेगळाच कारनामा केल्याने त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे पोलिस निरिक्षक रणदिवे यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या घोटाळ्यातील आरोपीला सोलापूर पोलिसांनी व्हीआयपी वागणूक देण्याचे कारण काय? याची चौकशी व्हावी अशी मागणी एकलव्य आदिवासी क्रांतिदलाचे विरेंद्र अहिरे, प्रकाश गावित, आकाश गावित, राहूल पेंढारकर, विजय सामुद्रे आदींनी केली आहे.