अटक केल्यावर महिलेचा रामनंदनगर पोलीस ठाण्यात गोंधळ

0

समतानगरातील तरुणावरील हल्ल्याची घटना


जळगाव: समतानगर परिसरातील बौद्धवाड्यात संदीप पुंडलिक नन्नवरे यांच्या घरावर आठ ते दहा जणांनी कुर्‍हाड, कोयत्याने हल्ला चढवून मारहाण केल्याची 4 रोजी घडली होती. हल्लयात संदीप नन्नवरे गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या दाखल गुन्ह्यात पोलिसांनी महिलेसह तिघांना गुरुवारी अटक केली आहे. यावेळी मला खोट्या गुन्ह्यात अडकवित आल्याचे सांगत संशयित कलाबाई अहिरे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. त्रास होत असून प्रकृती अस्वास्थ्याचे कारण कलाबाईने पोलिसांना सांगितल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरीत दोघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांची 10 पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पैशांच्या वादातून घरावर चढविला होता हल्ला

समतानगरातील बौद्धवाड्यातील संदीप पुंडलिक नन्नवरे (वय 36) यांच्या आईने कलाबाई अहिरे यांच्याकडून पाच हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यापोटी आजपर्यंत परतफेड म्हणून तब्बल 65 हजार रुपये फेडले आहेत, तरी आणखी 5 हजार रुपये मुद्दल शिल्लक असल्याने अहिरे यांचा मुलगा जिगर अहिरे याने घरी येवुन गोंधळ घातल्याने पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती मिळताच जिगर अहिरे, विक्की शिंदे, सागर अहिरे, कैलास शिंदे, कैलासचा मुलगा, कलाबाई अहिरे, चिऊ सपकाळे, अहिरे बुवा, प्रसाद महाजन, राहुल सुरवाडे यांनी घरावर हल्ला चढवला होता, त्यात संदिप नन्नवरे यांच्या डोक्यावर तोंडावर मानेवर तब्बल 25 टाक्यांच्या जखमा झाल्या असून काल रात्री प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तर भांडणात मध्यस्थी करणारा मित्र राहुल वाघ याचा पाय हल्लेखोरांनी हॉकीस्टीकने तोडला आहे.

खोटा गुन्हा दाखल केल्याचा महिलेचा आरोप

दाखल गुन्ह्यात तपासाधिकारी मनोज कुमार राठोड, सतिष डोलारे यांच्यासह पोलिस पथकाने बुधवारी रात्री कलाबाईल लक्ष्मण अहिरे (वय-52), विजया शरद रंधे ऊर्फ चिऊ सपकाळे (वय-30) आणि लक्ष्मण जयलू अहिरे ऊर्फ अहिरे बापु (वय-60) यांना अटक केली. अटकेनंतर कलाबाई यांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घालून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करुन वाद घातला. अधिकृत कागदोपत्री अटक झाल्यावर वैद्यकीय तपासणीवेळी त्रास होत असल्याचे सांगत त्यांनी रुग्णालयात ऍडमिट होण्याचे सांगत दाखल झाल्या. उर्वरीत दोघांना आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघा संशयितांना 10 पर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.