पिंपरी-चिंचवड । चिखली येथील तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात एका मुलीने बुधवारी (दि.9) मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात पोलीस आपल्याला अटक करून घेऊन जातील या भीतीने तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहीत सुभाष कांबळे (23 रा. चिखली) असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता चिखली येथे घडली. या घटनेची खबर त्याचे मामा तानाजी साहेबराव साळवे (38 रा. रहाटणी) यांनी वायसीएम पोलिसांना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित याचे पिंपरीतील मैत्रिणीसोबत भांडण झाले. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र तरुणी लग्नास नकार देत होती. याचा राग मनात धरून रोहितने काल तिच्यावर चाकूने वार केले. याप्रकरणी मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र गुरूवारी सकाळपर्यंत रोहितला पोलिसांनी अटक केली नव्हती. दरम्यान आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची त्याला माहिती मिळाली होती.
घरातच घेतला गळफास
त्याचा भाऊ कामानिमित्त बाहेर गेला होता. तो परत घरी आला असता घराचा दरवाजा बंद दिसला. त्याने दरवाजा ठोठावला. परंतु आतून काही प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे त्याने शेजार्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. रोहीत हा पिंपळे गुरव येथे ऑफीस बॉय म्हणून काम करत होता. घरकूलमध्ये आई, भाऊ, वहिनी व भावांची दोन मुले यांच्यासह राहत होता.