अटलच्या भूजल सर्वेक्षणाबाबत सत्ताधारी अंधारात

0

भाजपा उपनगराध्यक्षांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांवर तीव्र आगपाखड

भुसावळ : साधन अन् सूचिताचा गव-गवा करणार्‍या भाजपाच्या पक्ष बैठकीनंतर दोन पदाधिकार्‍यांमध्ये तुंबळ शाब्दीक हमरी-तुमरीनंतर भाजपातील अस्वस्थता चव्हाट्यावर आल्याची चर्चा ताजी असतानाच गुरुवारी भुसावळातील तापी नदीच्या नियोजित बंधार्‍यात बहुचर्चित अटल योजनेच्या भूजल सर्वेक्षणाचे काम सुरू होवूनही त्याची साधी भनक सत्ताधार्‍यांना न लागल्याने वा एमजीच्या अधिकार्‍यांनी माहिती न दिल्याने उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी अधिकार्‍यांवर टिकेची भडीमार करीत चांगलीच आगपाखड केल्याने भुसावळातील भाजपा पदाधिकार्‍यांमध्ये नेमके चालले आहे तरी काय? असा प्रश्‍न उपस्थित करण्यास निश्‍चितच वाव आहे. केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘अमृत‘ योजना शहरासाठी मंजूर असून गुरुवारी पदाधिकार्‍यांनी तापी काठावरील भूजल सर्वेक्षणाची
पाहणी केली.

भूजल सर्वेक्षणाबाबत सत्ताधारी अंधारात
अमृत योजनेंतर्गत शहरातील तापी नदीवर बंधारा बांधण्यात येणार असून तत्पूर्वी तापी पात्रातील पाण्याचे नमूने घेण्याचे काम सुरू आहे तर सूत्रांच्या माहितीनुसार सात दिवसांपूर्वी प्रत्यक्ष कामास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली सुरुवात करण्यात आली मात्र भाजपातील सत्ताधार्‍यांना याची साधी भनकही न लागल्याने उपनगराध्यक्षांनी अधिकार्‍यांना खडसावले. आतापर्यंत तापी पात्रात तब्बल 21 बोअरींग करण्यात आल्या आहेत तर गुरुवारी प्रत्यक्षात तापी पात्रात बोअर करण्यास सुरुवात करण्यात आली. पाण्याचे नमूने तसेच आढळलेली माती व खडकाचे नमूने जिऑलॉजीकल विभागाला पाठवून आगामी काळात बंधार्‍याची उंची, रूंदी काय असेल याबाबत धोरण निश्‍चित केले जाणार आहे.

भाजपातील अस्वस्थता टोकाच्या वळणावर
लोकनेते नाथाभाऊ अर्थात एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास टाकून भुसावळकरांनी माजी आमदार संतोष चौधरींना नाकारत भाजपाला एकहाती सत्ता दिली. दोन्हीही नेत्यांना भुसावळकरांनी भरभरून आशीर्वाद देत प्रेम कायम ठेवले आहे मात्र बुधवारच्या बैठकीत नगरसेवक व नगरसेविका पूत्रात एका विषयावर हमरी-तुमरी होवून वाद विकोपाला गेले अन् गावभरात भाजपाच्या बैठकीत ‘फ्री स्टाईल’ झाल्याची चर्चा पसरली. नगराध्यक्षांनी हा मस्करीचा प्रकार असल्याचे सांगून कानावर हात ठेवले मात्र भाजपामधील काहींनाच मिळणार्‍या ‘मानाच्या पानामुळे’ निष्ठावंत दूरावू लागले आहेत तर ज्यांनी सत्ता आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले ‘त्या‘ नगरसेवकांना सत्ताधारी विचारत नसल्याने ते ‘बंडाचा झेंडा’ हाती घेण्याच्या पावित्र्यात आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपातील अस्वस्था कुठल्या वळणावर पोहोचते हे पाहणे रंजक ठरणार आहे.