अटल ; उच्चाधिकार समितीची मान्यता

0

भुसावळ । भुसावळकांना अमृत ठरणार्‍या अटल योजनेच्या सात टक्के वाढीव खर्चास तांत्रिक समितीसह उच्चाधिकार समितीने मान्यता दिल्याने योजनेचा मार्ग सुकर झाला असून भुसावळकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. मंगळवारी मुख्य सचिवांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला तर बुधवारीदेखील नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैस्कर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तापी नदीतील बंधार्‍याच्या कामांचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले. बुधवारी झालेल्या बैठकीत सहसचिव पांडुरंग जाधव, कक्ष अधिकारी नीलेश पोतदार, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, एमजीपीचे कार्यकारी अभियंता एस.सी.निकम, डेप्युटी इंजिनिअर भंगाळे, एमजीपीचे अत्तरदे, नाशिक सीडीओ, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गावीत, भुसावळ पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आर.एस.वाघ आदींची उपस्थिती होती.

असे आहे योजनेचे स्वरूप
केंद्र शासनाच्या अटल योजनेंतर्गत 110 कोटी रुपयांमध्ये पहिल्या टप्प्यात 75 कोटींमध्ये ट्रीटमेंट प्लॅन, जलकुंभ, पाणीपुरवठा लाईन, रायझिंग मेन, कनेक्टींग मेन आदी कामे होतील तर दुसर्‍या टप्प्यात मशनरी व इलेक्ट्रीक तर तिसर्‍या टप्प्यात बंधार्‍याचे काम होणार आहे.

वाढीव खर्चास मान्यता
अटल योजनेसंदर्भात पालिकेच्या 12 रोजी झालेल्या विशेष सभेत जळगावच्या जैन एरिगेशनने प्रसिद्ध निविदेपेक्षा 11 टक्के वाढीव दर भरल्याने त्या संदर्भात सत्ताधार्‍यांनी वाढीव दराचा जनतेच्या डोक्यावर बोजा नको म्हणत पुर्ननिविदा काढण्यासंदर्भात वा संबंधितांशी वाटाघाटी करण्यासंदर्भात एकमत केले होते. त्यानंतर आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी संबंधित एजन्सीशी वाटाघाटी करीत 11 टक्क्यांवरील दर सात टक्क्यांपर्यंत कमी केले. वाढीव खर्चास उच्चाधिकार समितीसह तांत्रिक समितीने मान्यता मिळाल्याने योजनेचा मार्ग सुकर झाला असून भुसावळकरांसाठी ही बाब आनंददायी ठरणार आहे.

लघू पाटबंधारे विभागाला सर्वे करण्याचे आदेश
अटल योजनेसाठी तापी नदीपात्रात बंधारा बांधण्यात येणार असून बुधवारच्या बैठकीत लघू पाटबंधारे विभागाने 15 डिसेंबरपर्यंत सर्वे व डाटा पूर्ण करून सीडीओला तो देण्यासंदर्भात आदेश देण्यात आले तसेच सीडीओने 18 जानेवारीपर्यंत डिझाईन पूर्ण करावयाची आहे तर फेब्रुवारीअखेर लघू पाटबंधारे विभागाने अंदाजपत्रक सादर करावयाचे असून मार्च 2019 मध्ये याबाबत निविदा सादर करावयाची आहे. ठेव डिपॉझिट तत्वावर पाटबंधारे विभाग यावर काम करणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करावयाची आहे.

अटल योजनेसंदर्भात
बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. भुसावळच्या तापी नदीतील बंधार्‍याचा तातडीने सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले असून अटल योजनेच्या वाढीव खर्चास हायपॉवर व तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे. घनकचर्‍याचे वर्गीकरण करण्यासंदर्भातही आदेश देण्यात आले आहेत.
– रमण भोळे, नगराध्यक्ष