अटीतटीच्या सामन्यात गिल्स मुलरची राफेल नदालवर मात

0

नवी दिल्ली । विम्बल्डन ओपन स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का बसलेला आहे. तब्बल 4 तास आणि 48 मिनीटे चाललेल्या या सामन्यात लग्जमबर्गच्या गिल्स मुलरने नदालला 6-3, 6-4, 3-6, 4-6, 15-13 अशी कडवी झुंज देत पराभूत केले. जागतिक क्रमवारीत मुलर हा 26 व्या क्रमांकावर आहे. या पराभवानंतर राफेल नदालची विम्बल्डन स्पर्धेतली खराब कामगिरी अद्यापही कायम आहे. नदालवर मिळवलेल्या या विजयामुळे मुलरने उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा नक्की केली आहे. 2008 साली मुलर अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम 8 जणांमध्ये पोहचला होता. नदालविरुद्ध मुलरचा सामना हा इतका रंगला की शेवटचा सेट तब्बल 2 तास 15 मिनीटांनी संपला. याच निर्णायक सेटमध्ये मुलरने नदालवर बाजी मिळवली होती. सामना संपल्यानंतर पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत मुलर समाधानी वाटत होता. मला आनंद आहे की हा सामना अखेर संपलाय. पहिले दोन सेट जिंकल्यानंतर नदालने मला कडवं आव्हान दिले, त्याचवेळी हा सामना तितकासा सोपा जाणार नाही याची मला खात्री पटली होती. अखेरच्या सेटमध्ये जेव्हा मला दोन मॅच पॉईंटची गरज होती त्यावेळी मी पूर्ण जोर लावून तो सामना जिंकल्याचं मुलर म्हणाला.

मुलरचा झंझावात
पहिले दोन सेट गमावल्यानंतर नदालने सामन्यात चांगले पुनरागमन केले. तिसरा आणि चौथा सेट आपल्या नावे केल्यानंतरही अखेरच्या सेटमध्ये नदालने मुलरला चांगली टक्कर दिली. अखेरच्या सेटमध्येही नदालने मॅच पॉईंट वाचवत हा सामना रंगतदार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलरने दाखवलेल्या झंजावाती खेळासमोर नदालाचा टिकाव लागला नाही आणि 15-13 अशा फरकाने चौथा सेट जिंकत मुलरने सामनाही आपल्या खिशात घातला. तब्बल 4 तास रंगलेल्या या सामन्यावर अनेक नेटीजन्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.