अट्टल घरफोडे धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांच्या जाळ्यात
घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा : धुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले चोरटे
भुसावळ/धुळे : धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अट्टल दोघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून 40 इंच सोनी कंपनीची टी.व्ही., 10 ग्रॅम सोन्याची पोत, अडीच हजारांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मिळून 61 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इम्रान शेख रफिक ऊर्फ इम्रान चाट्या (22, रा.अंबिका नगर, इब्राहीम मशिदसमोर, धुळे) व हेमंत किरण मराठे (26, रा.वाहन मालक सोसायटी, हॉटेल डीडीआरसी मागे, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
घरफोडीची दाखल होती तक्रार
भाजीपाला विक्रेते रवींद्र बापूराव चौधरी (42, रा.प्लॉट नं.6, संताजी नगर हॉटेल चंडिकाच्या पाठीमागे, धुळे) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 9 ते 10 जानेवारीदरम्यान सोनी कंपनीची 40 इंच टी.व्ही, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व रोख रक्कम दहा असा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना घरफोडीचा गुन्हा चाट्यासह हेमंत मराठेने केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले व चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली देत मुद्देमाल काढून दिला. दरम्यान, आणखी काही संशयीतांना गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक नितीन चौधरी, हवालदार पंकज चव्हाण, एस.जी.कढरे, बाळासाहेब डोईफोडे, हेमंत पवार, स्वप्नील सोनवणे, चेतन झोलेकर, इंद्रजीत वैराट, प्रशांत पाटील आदींच्या पथकाने केली.