अट्टल घरफोड्याला जळगावच्या एमआयडीसी पोलिसांकडून अटक

जळगाव : जळगावच्या सुप्रीम कॉलनीत दीड लाखांची रोकड लांबविणार्‍या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. संजेश उर्फ शंकर प्रकाश कंजर (21) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसात दाखल होता गुन्हा
परवीन शाहरूख पटेल (25, रा.पांडे किराणा दुकानाशेजारी, सुप्रिम कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार, 14 ऑगस्ट रोजी कामाच्या निमित्ताने ते घराला कुलूप लावून गेले असता परीसरातील संजेश उर्फ शंकर प्रकाश कंजर (21) याने रात्री 11 वाजेच्या सुमारास परवीन पटेल यांचे बंद घरात कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील सामानांची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर घरातील डब्यात ठेवलेले दीड लाख रूपयांची रोकड चोरून नेली. हा उघडकीला आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, दत्तात्रय बडगुजर, सुधीर साळवे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी संजेश उर्फ शंकर प्रकाश कंजर (वय-21) याला बुधवारी अटक केली. संशयीत आरोपीला न्या. जे.एस. केळकर यांनी पोलीस कोठडी सुनावली.