जळगाव। अनेक ठिकाणी घरफोडी करणार्या अट्टल घरफोड्यास रामानंदनगर पोलिसांना यश आले असून त्याला शहरातील वाघनगरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने रामानंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार तर जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अशा पाच ठिकाणी घरफोड्या केल्याची कबूली दिली आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्यात घरफोड्यांची मालिकाच सुरू होती. या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रवीण वाडीले यांना माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी, शरद पाटील, विजय खैरे, विलास शिंदे, अतुल पवार, सुरेश मेढे, ज्ञानेश्वर कोळी, सागर तडवी यांना तपासासाठी पाठविले होते. त्यावेळी शहरात गेल्या महिनाभरात झालेल्या अनेक घरफोड्यांमध्ये सोफराजा उर्फ राजेंद्रचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या सोबत त्याचे आणखी काही साथीदारही आहेत. काही दिवसांपुर्वी रामानंदनगर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी वाघ नगरात सापळा रचला होता. मात्र त्यावेळी अट्टल घरफोड्या राजेंद्र चोरलेली दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली टॅमी टाकून पसार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. त्यासाठी पुणे, नाशिक, मध्य प्रदेश, धुळे, बुलडाणा येथे पथकाने या चोरट्यांचा शोध घेत होते. मात्र पोलिसांना यश येत नव्हते.
वाघनगरातून केली अटक…
अट्टल घरफोड्या राजेंद्र हा वाघनगरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ वाघनगरात गेले. त्यावेळी राजेंद्र संशयीत रित्या फिरताना दिसला. त्याला पोलिसांनी हटकले असता पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी काही अंतरापर्यंत पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत राजेंद्र याने रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रेमनगरात एक अशा पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 6 दुचाकीही चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. त्यातील दोन दुचाकी (क्र. एमएच-19-सीडी-6913, एमएच-19-सी-615) पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तर त्याने दोन पुणे, दोन नाशिक येथे विकल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत दिली आहे.