भुसावळ- भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरटा विजय राजू मट्टू (29, रा.पंत नगर, मलकापूर) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. 13 जुलै 2018 रोजी शहरातील गडकरी नगरातील विवाहिता चारुशीला शैलेश बिसे या पायी चालत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची 60 हजार रुपये किंमतीची मंगलपोत लांबवली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार यांना खबर्यांकडून गुप्त माहिती मिळाल्यानुसार हा गुन्हा आरोपी मट्टूने केल्याचे कळताच व तो मलकापूर रेल्वे स्टेशन आवारात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास सापळा रचून अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे, हवालदार जयराम खोडपे, पोलिस नाईक गुलबक्ष तडवी, किशोर महाजन, विकास सातदिवे आदींच्या पथकाने केली.