अट्टल चैन चोरटे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
साडेतीन लाखांची सोन्याची लगड जप्त : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
भुसावळ/धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने कल्यामधील अट्टल चैन चोरट्यांना शिताफीने अटक केली आहे. आरोपींनी धुळ्यातील एका गुन्ह्याची कबुली दिली असून संशयीतांकडून 70 ग्रॅम वजनाची व साडेतीन लाख रुपये किंमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. असू शाजमान सैय्यद (आंबेवली, पाटील नगर, भास्कर हायस्कूलजवळ, कल्याण) व मोहम्मद अनु सैय्यद (आंबेवली, पाटील नगर, भास्कर हायस्कूलजवळ, कल्याण) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर आरोपींचे साथीदार फिरोज सैय्यद व शोएब शेख तन्वीर (गांजावाल्याचा पुतण्या, दोन्ही रा.वॉर्ड नंबर, दोन धनगर वस्ती, श्रीरामपूर) व इम्रान शेख (रमजानपूरा, मालेगाव) हे पसार झाले आहेत.
धुळ्यातील चोरीचा उलगडा
अटकेतील आरोपींनी 15 मार्च रोजी ललित मोतीलाल लोढा (ऊसगल्ली, धुळे) यांच्या गळ्यातून सोन्याची चैन पांझरा नदीकाठून लांबवली होती व या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत धुळ्यात आल्याची माहिती एलसीबीला मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता चाळीसगाव रोड चौफुली भागातून संशयीतांना अटक करण्यात आली. अटकेतील मोहम्मद अनु सैय्यद विरोधात नेरूळ, तळेगाव, वाशी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे 13 तर असु शाजमानविरोधात हिल लाईन पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल पाटील, श्रीशैल जाधव, अमोल जाधव, महेंद्र सपकाळ आदींच्या पथकाने केली.