अट्टल दुचाकी चोरटा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या दोन दुचाकी जप्त
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : शहरातून आतापर्यंत 55 दुचाकींची चोरी
Attal two-wheeler thief in Bhusawal market in police net भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून शुक्रवारी शहरातून चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत तर आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. जमील खान फिरोज खान (रा.मुस्लीम कॉलनी, भुसवळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, शहर व बाजारपेठ हद्दीतून गेल्या सहा महिन्यात तब्बल 55 दुचाकींची चोरी होवूनही चोरटे पोलिसांना गवसत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गोपनीय माहितीनंतर चोरटा जाळ्यात
शुक्रवारी रात्री बाजारपेठचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, हवालदार गोपाळ गव्हाळे, सचिन पोळ हे गस्तीवर असताना मुस्लीम कॉलनी भागात एक संशयीत दोन दुचाकींसह संशयास्पद उभा असल्याची माहिती खबर्यांनी दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली असता संशयीत जमील खान फिरोज खान (रा. मुस्लीम कॉलनी, भुसवळ) हा पोलिसांना पाहताच पळू लागल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. संशयीताच्या ताब्यातून अॅक्टीवा (एम.एच. 19 बी.के.9750) व ज्युपीटर (एम.एच.19 सी.एल.7753) अश्या दोन गाड्या सुमारे 70 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपी जमील खान फिरोज खान यास शनिवारी न्यायालयाने 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.