अट्टल दुचाकी चोरटे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात : चोरीच्या तीन दुचाकी जप्त

जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे दोन दुचाकी चोरट्यांसह चोरीची दुचाकी खरेदी करणार्‍याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून चाळीसगाव शहरातून चोरलेल्या दोन दुचाकींसह नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतून लांबवलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. समाधान जाधव (रा.महादेवाचे बांबरुड, ता.पाचोरा) यास चोरीची दुचाकी वापरताना तर शुभम अशोक सपकाळ, रोहन ज्ञानेश्वर पवार (दोन्ही रा.पातोंडा, ता.चाळीसगाव) अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
समाधान जाधव हा चोरीच्या मोटारसायकल विकत घेऊन वापरत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना म्ळिाली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून शुभम अशोक सपकाळ आणि रोहन ज्ञानेश्वर पवार यांची नावे उघड झाली. अधिक चौकशीत तिघांकडून मिळालेल्या माहितीतून चाळीसगाव शहर, चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन धुळे आणि सरकारवाडा पोलिस स्टेशन नाशिक शहर अशा तिन ठिकाणी दाखल असलेले मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, राहुल पाटील, प्रितम पाटील, रविद्र पाटील, सचिन महाजन, चालक विजय चौधरी, दीपक चौधरी, मुरलीधर बारी आदींनी ही कारवाई केली. तिघा आरोपींना पुढील तपासकामी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.