अट्टल मोबाईल चोरटा ‘सल्या’ जेरबंद

0

जळगाव। शहरातील अशोक टॉकीज येथे 28 एप्रिल ला बाहुबली-2 चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या दोघांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी अट्टल मोबाईल चोरटा सलिम खान उर्फ सल्या कदीर खॉन पटवे याला बुधवारी अटक करून त्याच्याकडून चार हजार रुपये किंमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे. 28 एप्रिल रोजी बाहुबली-2 हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी दर्शकांची चांगलीच गर्दी उसळली होती. दरम्यान, झेडपी कॉलनीतील मुकूंदा सजनसिंग पाटील (वय-22) हा चित्रपट पाहण्यासाठी दुपारी 3 वाजेच्या शोला आला होता. तिकटी काढल्यानंत चित्रपटागृहता गेल्यानंतर ही घटना घडली.

शहर पोलिस ठाण्यात होता गुन्हा दाखल
तिकीट काढल्यानंतर चित्रपट गृहात गेल्यानंतर खिशातून मोबाईल काढण्यासाठी हात टाकला असता त्याला मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आले. यानंतर मोबाईल पडला असवा म्हणून चित्रपट गृहात शोधल्यानंतरही मिळून आला नाही. त्या दरम्यान, वैभव दर्शन बोरसे याचाही मोबाईल चोरीला गेल्याचे त्याला समजले. यानंतर शहर पोलिस स्टेशन गाठून मुकूंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास शेख करीम हे करीत होते.

सापळा रचून केली अटक
उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखली पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकून यांनी सहाय्यक फौजदार शेख करीम शेख गफ्फार, विजयसिंग पाटील, प्रितमसिंग पाटील, नवजीत चौधरी, दृष्यंत खैरनार, गणेश शिरसाळे, प्रशांत साळी, अमोल विसपुते, दिपक सोनवणे, सुनिल पाटील आदींचे पथक तयार करून मोबाईल चोरट्याच्या शोधार्थ पाठविले. विजयसिंग पाटील यांना मोबाईल चोरट्याविषयी गुप्त माहिती मिळाली असता आज बुधवारी सकाळीच पथकाने सापळा रचून अट्टल चोरटा सलीम खॉन उर्फ सल्या कदीर खॉन पटवे यास गेंदालाल मिल येथून अटक केली. यावेळी त्याची कसून चौकशी केली असता त्याने 4 हजार रुपये किंमतीचा मोबाईल पोलिसांना काढून दिला आहे. सल्या हा हिस्ट्रीशिटर असून त्याच्याविरूध्द वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये 25 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, सल्याकडून आणखी काही मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

6 मे पर्यंत पोलिस कोठडी
बुधवारी दुपारी अट्टल चोरटा सलीम खान उर्फ सल्या कदीर खान पटवे याला शहर पोलिसांनी न्यायालयात आणून त्याला न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्याला न्या. प्रतिभा पाटील यांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात 6 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी अ‍ॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, या चोरट्याविरूध्द अनेक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.