अट्टल मोबाईल चोरटे लोहमार्गच्या जाळ्यात : 30 मोबाईल जप्त

Attal Thieves In Dharangaon With 30 Stolen Mobile Phones in Bhusawal Lohmarg Police Net भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील दोन युवकांकडून तब्बल तीन लाख एक हजार 500 रुपये किंमतीचे रेल्वेतून चोरलेले 30 मोबाईल जप्त केले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. वैभव विष्णू कवळे आणि सागर माणिक इंगळे (धरणगाव, ता.मलकापूर, जि.बुलढाणा) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

प्रवाशाचा लांबवला होता मोबाईल
रेल्वेमधून प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. बुलढाणा तालुक्यातील सव येथील रहिवासी गोपाल किसन जवंजाळ हे मुंबई-मलकापूर असा प्रवास मुंबई हावडा मेलने 16 सप्टेंबरला प्रवास करीत होते. या प्रवासादरम्यान कोच नंबर एस 2 मधील बर्थ 26,27 व 28 यावरून ते प्रवास करीत असताना कोणीतरी चोरट्याने त्यांचा 18 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. त्यांना भुसावळ येथे जाग आल्यावर मोबाईल चोरीची घटना समोर आली. त्यांनी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ लोहमार्गचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचारी अजित तडवी, जगदीश ठाकुर, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत, सागर खंडारे व रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमोद चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की काही चोरटे मलकापूर येथे चोरीतील मोबाईल बाजारात विकण्यासाठी येणार आहे. या माहितीवरून पोलिसांनी मलकापूर येथे जाऊन सापळा लावला. मलकापूर येथील सारथी कपड्यांच्या दुकानाजवळून पोलिसांनी वैभव कवळे आणि सागर इंगळे (रा. दोन्ही रा.धरणगाव, तालुका मलकापूर) यांच्या मुसक्या आवरळल्या.

चोरीचे तब्बल 30 मोबाईल जप्त
चोरट्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ तीन लाख 1हजार 500रुपये किमतीचे एकूण 30 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. दोन्ही संशयीतांना रविवारी रात्री अटक करून सोमवारी न्यायालयात नेले असता 6 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, डीवायएसपी दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक घेरडे आणि आरपीएफचे निरीक्षक राधाकृष्ण मीना यांनी ही कारवाई केली. हवालदार श्रीकृष्ण निकम या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.