अट्रावलच्या जागृत मुंजोबा यात्रोत्सवाला प्रारंभ

0

पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी घेतले दर्शन

यावल- जागृत व नवसाला पावणारा अशी श्रद्धा असलेल्या अट्रावलच्या मुंजोबाच्या दर्शनासाठी शनिवारी हजारो भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. सुमारे 300 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अट्रावलला मुंजोबाचे मंदिर असून येथे नवस मानल्यानंतर ते पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मुंजोबाच्या यात्रोत्सवास शनिवार 9 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून पौर्णिमेपर्यंत दर शनिवारी व सोमवारी यात्रोत्सव भरणार आहे.

नवस फेडण्यासाठी गर्दी
मुंजोबा यात्रोत्सवानिमित्त जाऊळही काढले जातात तर लोडगे, वरण बट्टी, वांग्याच्या भाजीचा खास मेनु ठेवला जातो शिवाय मुंजोबास दही, भात, लोणी, यांचा नैवेद्य दिला जातो. यात्रोत्सवानिमित्त यावल, फैजपूर, भुसावळ, रावेरसह जिल्हाभरातून बसेस सोडण्यात येत असून विविध दुकाने थाटण्यात आली आहेत शिवाय उंचच उंच पाळणेही दाखल झाल्याने भाविकांचा उत्साह वाढला आहे. यावल पोलिस स्टेशन ठाण्याचे निरीक्षक डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दीपक ढोमणे व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त राखला आहे.