तयारीला वेग ; नवसाला पावणार्या देवस्थानामुळे राज्यभरातून होते भाविकांची गर्दी
यावल- तालुक्यातील अट्रावल येथील जागृती मुंजोबा महाराज यात्रोत्सवास 9 फेबु्रवारीपासून प्रारंभ होत आहे. या देवस्थानावर खान्देशवासीयांसह राज्य-परराज्यातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. प्रस्तुत स्थान हे अट्रावल-भालोद रोडवर मंदिराच्या पश्चिमेस जीर्ण वडाच्या वृक्षाखाली मुंजोबा देवस्थान आहेे. मनोकामना पूर्ण होत असल्याने येथे भाविक दरवर्षी विविध नवसही फेडतात. यात्रोत्सवाच्या पर्वावर आतापासूनच व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यास प्रारंभ केला आहे. महिनाभरातील शनिवार व सोमवार या दिवशी येथे ही यात्रा भरते. पहिला वार 9 फेबु्रवारी, दुसरा 11, तिसरा 16 व चौथा 18 असे चार वारी यात्रोत्सव होणार आहे.
नवसाला पावणारा मुंजोबा
मुंजोबाची यात्रा ही माघ शुद्ध अमावस्या ते माघ शुद्ध पौर्णिमापर्यंत असते तर सोमवारी व शनिवारी यात्रोत्सव असतो. यात्रेच्या वेळी लहान मुलांचे जाऊळ देणे, नवस मानणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होतात. नैवेद्यासाठी लोडगे, वरण बट्टी, दही, भात, लोणी, असा नैवेद्य तयार केला जातो व देवापुढे ठेवला जातो. तसेच वरणभात, बट्टी व वांग्याची भाजी मंदिर परीसरात बनवून नातेवाईक व इष्टमित्रासह भोजन पक्तिंचे दृश्य पाहावयास मिळते.
परीवहन मंडळातर्फे बसेसची सुविधा
यात्रोत्सवात जिल्ह्यातून व बाहेरील राज्यातून येणार्या भाविकांसाठी ये-जा करण्यासाठी राज्य परीवहन मंडळातर्फे भुसावळ, यावल, जळगाव, फैजपूर व इतरत्र ठिकाणाहून बसेस सोडल्या जातात. तसेच खाजगी रीक्षा चालकही प्रवाशांची वाहतूक करतात.
मनोरंजनाची साधने उपलब्ध
यात्रेचे निमित्त जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील बर्हाणपूर, खंडवा व इतरत्र ठिकाणाहून खेळणी, पाळणे, सर्कस इतरत्र खेळ याठिकाणी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. दर्शनाबरोबरच मनोरंजनाची साधनेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात तसेच मोठ-मोठे विविध स्टॉल येथे सजवून लावलेले असतात. तसेच याठिकाणी खाद्य पदार्थांचे हॉटेल्स तसेच हातगाड्या येथे लावल्या जातात.
मुंजोबा स्वतःच घेतो अग्निडाग
300 वर्षापूर्वीचे जागृत देवस्थानाची देखभाल कोळी पंच मंडळी देखभाल करतात. या ठिकाणी तीन देवस्थान आहेत. यात पहिले संतोषी मातेचे, मनुदेवीचे व मुंजोबा असे मंदिर आहेत. यात्रा झाल्यानंतर देवस्थानमध्ये असलेला पूजेचा कचरा, नारळ आपोआप प्रज्वलीत होवून अग्निडाग घेतला जातो. हा अग्निडाग अमावस्येपर्यंत घेण्यात येतो. त्याचप्रमाणे आजू-बाजूच्या खेड्यागावातून याठिकाणी लोक वर्गणी जमा करून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडतो.