यावल : शेतात उभ्या पिकात बकर्या का चारत आहे ? अशी विचारणा केल्याने राग येवून बकर्या चारणार्या सहा जणांनी शेतकर्याला बेदम मारहाण केली तर एकाने विळ्याने वार करून जखमी केले. ही घटना अट्रावल शिवारात घडली.
सहा जणांविरोधात गुन्हा
अट्रावल, ता.यावल गावाजवळील शेती किशोर देवराम राणे (46, रा.यावल) यांनी बटाईने केली आहे. या शेतात त्यांनी हरभरा पेरणी केली आहे. शनिवारी त्यांच्या शेतात सकाळी सात वाजता किशोर राणे यांची आई सिंधुबाई राणे या मजुरांसह शेतात गेले असता त्यांच्या शेतामध्ये हरभर्याच्या उभ्या पिकात काही जण बकर्या चारत होते. ही माहिती सिंधूबाई यांनी आपला मुलगा किशोर राणे यांना दिली. त्यानुसार किशोर राणे शेतात गेले व त्यांनी या बकर्या चारणार्यास जाब विचारला असता त्याचा राग येवुन बकर्या चारणारे राजेंद्र काशीनाथ जाधव, विनोद गोविंदा खैरे, अनिल धनगर, भुरा छगन धनगर, एकनाथ भील आणि बबलू धनगर (सर्व रा.यावल) यांनी किशोर राणे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिविगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. संशयीत आरोपी राजेंद्र जाधव यांनी हातातील विळ्याने किशोर राणे यांच्यावर वार करून जखमी केले. या संदर्भात यावल पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.