बॅण्डच्या वाहनाची तोडफोड ; सहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा
यावल- तालुक्यातील अट्रावल येथे बँडवर गाणे लावण्याच्या कारणावरुन दंगल झाली. त्यात तब्बल पाच जण जखमी झाले असून बँडच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी यावल पोलिसात सहा जणांसह अज्ञात 15 ते 10 जणांविरूध्द दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गाणे लावण्यावरून वाद विकोपाला ; पाच जण जखमी
कैलास रमेश जैन (रा.मस्कावदसीम, ता.रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 4 मे रोजी रात्री स्वप्निल किटकूल कोळी यांच्याकडे लग्नाच्या कार्यक्रमात बँडवर गाणे वाजवणे सुरू होते. दरम्यान, रात्री 11.30 वाजेच्या सुमारास बँडवर गाणे लावण्याच्या कारणावरून भुषण तायडे, पंकज तायडे, सागर तायडे, सावंत तायडे, अनिल तायडे, माया तायडे व सोबत सुमारे 15 ते 20 जणांची लाठ्या-काठ्या घेवून हातात विटा, दगड आणत फिर्यादी कैलास जैनसह सुपडू भावराव सपकाळे, योगेश छबीलदास सपकाळे, तुषार दिलीप सपकाळे, मुकेश निळकंठ सपकाळे व सुरज राजेेंद्र सुरळकर यांना जबर मारहाण केली व सोबतच बँडच्या वाहनाची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शेख अजीज शेख हमीद करीत आहे.