अट्रावलला हिस्सा वाटणीवरून दोन गटात हाणामारी : दंगलीसह परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

यावल : तालुक्यातील अट्रावल येथे हिस्सेवाटणीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यात दोघा बाजूंनी परस्पर विरोधात फिर्यादी दिल्यानुसार दंगलीसह विविध कलमान्वये येथील पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. शनिवारी रात्री हा प्रकार घडला.

दोन्ही गटाची एकमेकाविरोधात फिर्याद
अट्रावल येथील संगीता चंद्रकांत चौधरी (39) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी रात्री 9 वाजता त्यांच्या घराच्या ओट्यावर शाम चौधरी, योगीता चौधरी, गिरीश चौधरी, रोशन चौधरी, गोलू उर्फ योगेश चौधरी, चंद्रकांत चौधरी व प्रतिभा चौधरी (सर्व रा.अट्रावल) हे आले. त्यांनी वडिलोपार्जित शेती घर व जागा यांच्या हिस्सा वाटणीच्या कारणावरून संगीता चौधरी व त्यांची मुलगी रुचिता चौधरी यांना शिवीगाळ व चापटबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
दुसरी फिर्याद योगीता शाम चौधरी (41) यांनी दिली. त्यानुसार अट्रावल येथे शनिवारी रात्री नऊ वाजता पौर्णिमा चौधरी व रुचिता चौधरी यांनी घराचे हिस्सा वाटणीच्या कारणावरून योगिता चौधरी यांना शिविगाळ केली. पौर्णिमा चौधरी हिने योगीता चौधरी यांच्या डोक्यावर, डाव्या डोळ्याच्या बाजूला स्टीलचा डबा मारुन दुखापत केली. तसेच मुलगा गिरीश चौधरी हा आवरण्यास आला असता त्यास रुचिता चौधरी हिने शिवीगाळ व चापट बुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तपास पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहेत.