अडचणीतील ‘मधुकर’ला आता सहकार्य व संयम दाखवण्याची गरज

चेअरमन शरद महाजन : कारखाना भाडे तत्वावर गेल्यानंतर सुगीचे दिवस येणार असल्याचा विश्‍वास

फैजपूर : अडचणीत असलेल्या मधुकर सहकारी कारखान्याला आता सहकार्याची गरज आहे व त्यासाठी सर्व घटकांनी संयम दाखवत मदत केल्यास कारखाना व आसवनी प्रकल्प भाडेतत्त्वावर देऊन पुन्हा सुगीचे देऊ शकतात, असा आशावाद 47 व्या वार्षिक सभेत गुरुवारी चेअरमन शरद महाजन व संचालक नरेंद्र नारखेडे यांनी व्यक्त केला. उभय पदाधिकारी म्हणाले की, मधुकर सहकारी साखर कारखान्याने गेल्या 42 वर्षात ऊस उत्पादक, कामगार व त्यावर अवलंबून सर्वच घटकांचे हित जोपासले, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सहकार्य केले मात्र गेल्या दोन वर्षात कारखाना अडचणीत सापडला असून बंद अवस्थेत आहे मात्र भाडे तत्वावर तो दिल्यानंतर निश्‍चित सुगीचे दिवस येतील.

सर्व विषयांना एकमताने मंजुरी
कारखाना सभागृहात 47 व्या ऑनलाईन वार्षिक सभेचे आयोजन चेरमन शरद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, रमेश चौधरी, उपाध्यक्ष भागवत पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, जिल्हा बँक संचालक गणेश नेहते, कामगार संघटनेचे अध्यक्ष किरण चौधरी व सर्व संचालक यांची उपस्थिती होती. विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक शंकर पिसाळ तर मागील सभेचे इतिवृत्त वाचन रत्नदीप वायकोळे यांनी केले.

कारखाना हितासाठी सदैव सोबत : आमदार शिरीष चौधरी
आमदार शिरीष चौधरी यांनी या वार्षिक सभेला मुंबई येथून ऑनलाईन सहभाग नोंदवला. साखर साठा विक्रीतून जी रक्कम जमा झाली आहे त्यातून शेतकरी, कामगार, व्यापारी यांची देणी देण्यासाठी प्राधान्य द्यावे व कारखाना भाडेतत्त्वावर देताना सर्वांना विश्‍वासात घ्यावे अशी सूचना केली तसेच कारखाना सुरू करण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील त्यासाठी सदैव सोबत असल्याची ग्वाही दिली.

न्यायालयातून योग्य निर्णय : शरद महाजन
नैसर्गिक संकट, दुष्काळ, ऊस उत्पादन कमी व अन्य बाबींमुळे कारखाना गेल्या दोन वर्षापासून बंद आहे. कारखान्याचा तोटा 109 कोटी पर्यंत गेला आहे तर साखर विक्रीतून 29 कोटी 69 लाखांची रक्कम न्यायालयात जमा झाली आहे त्यातून न्यायालय योग्य तो निर्णय घेईल तसेच कारखाना व आसवनी प्रकल्प 15 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे योग्य ती कारवाई करून सादर करण्यात आला आहे त्यासाठी योग्य प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भाडे तत्वाच्या निर्णयाची मुहूर्तमेढ रोवली जाईल. भाडे तत्वाचा निर्णय सर्वांच्या सहकार्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही चेअरमन शरद महाजन म्हणाले.

कारखान्याला आता सहकार्याची गरज : नरेंद्र नारखेडे
कारखान्याचे संचालक नरेंद्र नारखेडे मनोगतात म्हणाले की, कारखान्यात संचालक म्हणून सर्वांनी प्रामाणिक कार्य केले मात्र दुर्दैवाने काही कारणांमुळे दोन वर्षापासून कारखाना बंद आहे. टीका करणार्‍यांनी माहिती घेऊनच टीका करावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘मधुकर’ ने 42 वर्षे सर्व घटकांचे हित जोपासून त्यांना भरभरून दिले मात्र आज अडचणीत सापडलेल्या मधुकरलाच सहकार्याची गरज आहे त्यासाठी सर्वांचे सहकार्य व संयमाची गरज आहे. 42 वर्षात कारखान्याने कोणाची देणी ठेवली नाही मात्र दोन वर्षात अडकलेली सर्वांची देणी देण्यासाठी कारखाना कटिबद्ध असून त्यासाठी भाडे तत्वाचा निर्णय अंतिम सत्य आहे. त्यानंतरच हे शक्य होणार आहे. संचालक मंडळाची ही अंतिम वार्षिक सभा असल्याचेही त्यांनी नमूद करीत सहा वर्षात एक रुपयादेखील संचालकांनी घेतला नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार अरुण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार व्हा.चेअरमन भागवत पाटील यांनी मानले.