नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुक रिंगणातून बाद करण्यासाठी नरेंद्र मोदींनी कट रचल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला होता. लालूंच्या या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करातना विनय कटियार यांनी म्हटले आहे की, ‘कदाचित लालूप्रसाद यादव यांच्या वक्तव्यात सत्यता असेल, मला याबाबत काहीच माहिती नाही,’ कटियार यांच्या या विधानामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवाय लालूंच्या आरोपाला भाजप नेते विनय कटियार यांनी अप्रत्यक्षपणे सहमती दर्शवल्याने भाजपला घरचा आहेर मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी बुधवारी मोठा निर्णय दिला होता. अडवाणी यांच्यासह मुरलीमनोहर जोशी, उमा भारतींसह इतर नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालणार आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. अडवाणी आणि जोशी हे दोघेही राष्ट्रपतीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.
बुधवारी बाबरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कटाचा खटला चालविण्याचा निकाल दिल्यानंतर पंतप्रधान मोदींवर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी गंभीर आरोप केले होते. राष्ट्रपतीपदासाठी अडवाणी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. तेव्हा सीबीआयने स्वत:हून सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी अडवाणी आणि इतरांविरोधात खटला सुरू करण्याची मागणी केली. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीतून अडवाणी यांचे नाव मागे पडण्यासाठीच मोदींनी ही राजकीय खेळी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान लालूंच्या या आरोपावर कटियार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे खळबळ उडाली आहे.