अडवाणी-जोशींविरुद्ध कट रचल्याचा खटला चालणार!

0

नवी दिल्ली : बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांना जोरदार झटका दिला. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा या नेत्यांवर गुन्हेगारी कारस्थान रचल्याचा आरोप निश्‍चित केला. न्यायमूर्ती पी. सी. घोष आणि न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन यांनी हा निकाल दिला. बाबरी प्रकरणी लखनऊ आणि रायबरेली न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची यापुढे लखनऊ न्यायालयात एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. खटल्याची नियमित सुनावणी घेऊन दोनवर्षात निकाल लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. बाबरीप्रकरणी मागच्या 25 वर्षांपासून खटला सुरु आहे.

कल्याणसिंहांना तूर्त दिलासा..
या खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत खटल्याची सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांची बदली करता येणार नाही, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणी फक्त माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. सिंह यांना राज्यपालपदाचे संविधानिक संरक्षण मिळाल्याने त्यांच्यावर गुन्हेगारी कारस्थानाचा आरोप लावता येणार नाही. पण राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर खटला चालवता येईल. विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, सतीश प्रधान, चंपत राय बन्सल यांच्यावर गुन्हेगारी कारस्थान रचल्याच्या आरोपातंर्गत खटला चालेल. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. या प्रकरणी रायबरेली आणि लखनऊ येथील न्यायालयात सुनावणी सुरु आहे. लखनऊ न्यायालयात कारसेवकांविरोधात तर, रायबरेली येथील न्यायालयात व्हीव्हीआयपी आरोपींविरोधात खटल्याची सुनावणी सुरु आहे.

भाजपच्या अडचणी वाढल्या…
याआधी, रायबरेली न्यायालयाने अडवाणी, जोशी, उमा भारती यांच्यासह भाजपनेते कल्याण सिंह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विहिंपनेते गिरिराज किशोर, विनय कटियार आदींवरील कटाचा आरोप काढून टाकला होता. तर अलाहाबाद उच्च न्यायालयाने 20 मे 2010 रोजी या निकाल कायम ठेवला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या बाजूने निकाल देत, अडवाणींसह 13 जणांवर पुन्हा खटला चालवण्यास संमती दिली आहे. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत असतानाच हा निकाल आल्याने भाजपसाठी तो धक्का मानला जात आहे. आडवाणी, जोशी, उमा भारतींवर चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप आहे. या भाषणांनी प्रेरीत होऊन कारसेवकांनी 1992 साली बाबरी मशीद पाडली. मशीद पाडली त्यादिवशी जवळच उभारण्यात आलेल्या स्टेजवरुन या नेत्यांनी चिथावणीखोर भाषणे दिली. मशीद पाडण्याचा कटाचा हा एक भाग होता, असे सीबीआयचे म्हणणे आहे.