अडवाणी, जोशी, उमा भारतींना जामीन

0

नवी दिल्ली । बाबरी मशीद प्रकरणी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जामीन दिला आहे. या नेत्यांसह भाजपच्या 12 जणांना न्यायालयाने जामीन दिला आहे. भाजपच्या नेत्यांनी न्यायालयासमोर सर्व आरोप नाकारले आहेत. अडवाणी, जोशी, उमा भारती यांच्यासह भाजपच्या इतर नऊ नेत्यांनादेखील सीबीआयने जामीन मंजूर केला आहे. 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजप नेत्यांना जामीन दिला आहे.

आता कोणतीही सूट दिली जाणार नाही
बाबरी मशीद प्रकरणात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर राहिले होते. यासोबतच भाजपचे नेते विनय कटियार, विश्‍व हिंदू परिषदेचे विष्णू हरी दालमिया, साध्वी ऋतुंभरा यांनादेखील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. बाबरी मशीद प्रकरणात आता कोणतीही सूट दिली जाणार नाही. यासोबतच या प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची याचिकादेखील स्वीकारली जाणार नाही, असे सीबीआयच्या विशेष न्यायालयाने म्हटले होते.

सुनावणी दोन वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्याशिवाय इतर सर्व आरोपींवर बाबरी मशीद ढाचा पाडल्याचे षडयंत्र रचल्याप्रकरणी खटला चालवला जाणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने 19 एप्रिल रोजी म्हटले होते. बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी दररोज घेऊन ती पुढील दोन वर्षांमध्ये पूर्ण केली जावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. भाजप नेते कल्याण सिंह राज्यपाल पदावर असेपर्यंत त्यांच्याविरोधात खटला चालणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ढाचा पाडणे आणि चिथावणी देणे ही तक्रार
न्यायालयाने बाबरी मशीद प्रकरणात रायबरेलीच्या न्यायालयात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या विरोधात सुरू असलेला खटला लखनऊ न्यायालयात वर्ग केला आहे. दोन्ही प्रकरणांची सुनावणी एकाचवेळी व्हावी, या हेतूने हा आदेश देण्यात आला. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक तक्रार बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्याप्रकरणी कारसेवकांविरोधात, तर दुसरी तक्रार बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी चिथावणी दिल्याबद्दल अडवाणी यांच्यासह 13 जणांविरोधात दाखल करण्यात आली होती.

राममंदिरासाठी कोणी रोखू शकत नाही
अयोध्या येथे राम मंदिर उभारण्यापासून आता कोणीच रोखू शकत नाही, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. लखनऊमधील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयात मंगळवारी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावर या प्रकरणी आरोप निश्‍चिती होणार होती. त्यापूर्वीच साक्षी महाराज यांनी अयोध्येतील राम मंदिराविषयी वक्तव्य केले आहे. साक्षी महाराज म्हणाले, की राम मंदिर उभारण्यापासून रोखणारी शक्ती आता या पृथ्वीवर नाही. अयोध्यात राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदायाचाही पाठिंबा मिळत आहे. राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद हा वाद मिटला आहे. त्यावेळी राम मंदिराला विरोध करणारे आता राम भक्त बनले आहेत.