अडावदसह धानोर्‍यात जुगार अड्ड्यावर धाड ; 45 जुगारी जाळ्यात

0

16 दुचाकी, नऊ चारचाकीसह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपडा– तालुक्यातील अडावदसह धानोरा येथील हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह पथकाने सोमवारी मध्यरात्री छापा टाकून तब्बल 45 जुगारीसह 16 दुचाकी, नऊ चारचाकी मिळून 45 लाख 55 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एखाद्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची ही दुर्मीळ बाब असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईने जुगार्‍यांचे धाबे दणाणले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अडावद पोलिसात या प्रकरणी दोन्ही स्वतंत्र कारवाईप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या संदर्भात आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मध्यरात्री धाडी

अडावद बसस्थानकासमोरच बिनदिक्कत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. या अड्ड्यावरून चार लाख 18 हजार 360 रुपयांची रोकड, 60 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, 12 लाख रुपये किंमतीच्या तीन चारचाकी, 57 हजार 500 रुपये किंमतीचे चार मोबाईल मिळून 17 लाख 35 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसरी धाड धानोरा गावाजवळील महामार्गावर चालणार्‍या अड्ड्यावर टाकण्यात आली. या अड्ड्यावरून एक लाख 33 हजारांची रोकड, तीन लाख 40 हजार रुपये किंमतीच्या 14 दुचाकी, 23 लाख रुपये किंमतीच्या सहा चारचाकी, 46 हजार 500 रुपये किंमतीचे 20 मोबाईल असा 28 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाई मिळून एकूण 45 लाख 55 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यांचा कारवाईत सहभाग

सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल पाटील, समाधान पाटील, जुबेर शेख, भूषण पाटील, एएसआय दिलीप कोळी, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, राजेश काळे, अय्याज शेख, हेमंत पाटील, चेतन ढाके, नितेश बच्छाव, राकेश बिर्‍हाडे आदींनी ही कारवाई केली.