अडावद ग्रामपंचायत निवडणूक; सहा प्रभागांमध्ये 65 टक्के मतदान

0

अडावद । येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. एकुण 6 प्रभागातील 16 हजार 283 मतदारांपैकी 10 हजार 632 स्त्री-पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी 65 टक्के ऐवढे मतदान झाले. उनपदेव येथील आदिवासी बांधवांनी प्रथमच आपल्या उनपदेव येथील वस्तीवर स्वतंत्र मतदानाचा हक्क बजावला. थेट जनतेतुन सरपंच निवडला जाण्याची प्रक्रीया राबवल्या गेल्याने 28 मे रोजीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तासभर मतदान प्रक्रिया झाली ठप्प
येथील 6 प्रभागातील 21 मतदान केंद्रांवर सकाळपासुनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी कडक उन्हामुळे संथगतीने सुरु असलेल्या मतदानाने सायंकाळी गती घेत 65 टक्के एवढा पल्ला गाठला. लोकनियुक्त सरपंच पदासाठी 6 उमेदवार तर सदस्य पदासाठी 45 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. यात 5 हजार 691 पुरुष तर 4 हजार 941 स्त्री मतदारांनी मतदान केले. दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास प्रभाग क्रमांक 4/3 मधील मतदान यंत्राच्या कंट्रोल युनिटला तांत्रिक अडचण आल्यामुळे सुमारे तासभर मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. परंतु प्रशासनाने वेळीच दखल घेत नविन मतदान यंत्राने मतदान प्रक्रिया सुरळीत केली. एकूण 6 प्रभागातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 हजार 126 मतदारांपैकी 2 हजार 227 एवढे सर्वाधिक 71 टक्के मतदान झाले. तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2 हजार 755 पैकी फक्त 1 हजार 438 एवढे सर्वात कमी 52 टक्के मतदान झाले. रखरखत्या उन्हात उमेदवार, कार्यकर्ते व मतदार यांची धावपळ लक्षवेधी ठरली.