अडावद। आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय, शिक्षण विभाग, नागरी विकास, महिला व बाल कल्याण विभाग, पंचायत राज मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने बालकाचे आरोग्य, त्याची पोषण विषयक स्थिती, शिक्षणाची संधी व दर्जा सुधारावा यासाठी 1 ते 9 वयोगटातील अंगणवाडी दाखल व दाखल नसलेल्या सर्व शासकीय अनुदानीत शाळा व खाजगी अनुदानीत शाळा तसेच या वयोगटातील शाळेत न जाणारे बालकांना जंतनाशकाची गोळी खाऊ घालण्याचा कार्यक्रम राज्यभर राबविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अडावद येथील उर्दू हायस्कूलमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दायमा यांच्या हस्ते जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येऊन गोळ्या खाऊ घालण्याचा कार्यक्रम पार पडला.
मुलांच्या शारिरीक विकासासाठी महत्वाचे
मुलांमध्ये जंतांच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण आणि रक्तक्षय होऊन सतत थकवा जाणवतो त्यांची शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्णत: होत नाही. म्हणून लहानपणीच जंतांचा होणारा प्रादुर्भाव थांबविणे गरचेचे आहे. जंतांचे प्रकार, संसर्गाची लक्षणे, जंत दोषांमुळे बालकांचे शिक्षण व दिर्घकालीन कार्यक्षमता यावर कोणता परिणाम होतो. जंत संसर्गावर कोणता उपचार करावा जंतनाशकाचे फायदे इ. विषयांवर अडावद प्रा. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दायमा यांनी शालेय विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत आरोग्य सहायक पी.ए. पारधी, आरोग्य सेवक सुधीर चौधरी व उज्ज्वल परदेशी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक एफ.जी. पटेल यांनी सर्व मान्यवरांचे शाल व गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार मानले. कार्यक्रमात सर्व शालेय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.