अडावद संस्थाध्यक्षांची बनावट स्वाक्षरी करून शिक्षक भरती ! : 14 जणांविरोधात गुन्हा

चोपडा : तालुक्यातील अडावद येथील सार्वजनिक विद्यालयात संस्थेच्या अध्यक्षांची बनावट स्वाक्षरी करून शिक्षक भरती करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ
अडावद येथे बनावट स्वाक्षरी करून शिक्षक भरती करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अडावद परीसर शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब चिंतामण देशमुख यांनी प्रोसिडींग बुकमध्ये अध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षर्‍या करून, धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात फेरफार अर्ज करण्यात आले. रतीलाल सुका राजकुळे यांना अध्यक्ष भासवून शिक्षक भरती प्रस्तावांवर अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून सहा शिक्षकांची भरती करण्यात आली. बनावट दस्तावेजांच्या आधारावर शिक्षक मान्यता घेऊन शिक्षकांचे वेतनही काढण्यात आला.

अडावद पोलिसात गुन्हा
हा प्रकार संस्थाध्यक्ष महेंद्र देशमुख यांना लक्षात आल्यामुळे देशमुख यांनी अडावद पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिल्यानुसार बाळासाहेब देशमुख, निवृत्त मुख्यध्यापिका मीना देशमुख, जिजाबराव देशमुख, रतीलाल राजकुळे, शांताराम कोळी, प्रमोद देशमुख, संदीप पाटील, रामकृष्ण पाटील, मनोज देशमुख, नंदकुमार देशमुख, विजय कोळी, मुख्याध्यापक अशोक कदम, निवृत्त मुख्यध्यापक सुभाष पाटील व शांताराम गवळे या 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अडावद स्थानाचे सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे हे करत आहेत.