अडिच वर्षात 10 हजार सदनिका बांधणार!

0

पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए)चा वर्ष 2018-2019चा अर्थसंकल्प गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सतीशकुमार खडके यांनी सादर केला. 561 कोटी तीन लाख 12 हजार रुपयांचा हा अर्थसंकल्प असून, यावेळी झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे होते. चालू अर्थवर्षात 554 कोटी 99 लाख एवढा खर्च अपेक्षित असून, 15 कोटी 4 लाख रुपयांच्या शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. तर यामध्ये आरंभीची शिल्लक 97.30 कोटी इतकी आहे. पुढील अडिच वर्षामध्ये 10 हजार सदनिका बांधण्याचे उद्दिष्ट प्राधिकरणाने निर्धारित केले आहे.

नवीन सदनिकांसाठी सर्वाधिक तरतूद
प्राधिकरणाची 330वी आर्थिक सभा गुरुवारी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी चालू वर्षाचा अर्थसंकल्प प्राधिकरणाचे सीईओ तथा सदस्य सचिव सतिशकुमार खडके यांनी सभेपुढे सादर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे यांनी विविध विभागप्रमुखांच्या सहाय्याने हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे. या अर्थसंकल्पात नवीन सदनिकांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, येत्या अडिच वर्षात 10 हजार सदनिका बांधण्याचे नियोजित आहे. त्यासाठी 213 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या शिवाय, सेक्टर क्रमांक 12, 32, 29, 1, 4, 10 येथे नवीन गृहप्रकल्प राबविण्यासाठीदेखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे चिंचवड जुना नाका ते रावेत रस्त्यासाठी 15 कोटी रुपये वर्ग करण्यासाठीची तरतूददेखील अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच, प्राधिकरणांतर्गत सेक्टर क्रमांक 9, 11, 13, 14 व एकमधील रस्त्यांसाठी 10 कोटी व महापालिका हद्दीतील स्पाईन रोडसाठी सहा कोटींची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे सीईओ खडके यांनी सांगितले.

रस्ते बांधणी, खुले प्रदर्शन केंद्रासाठीही निधी
दैनिक जनशक्तिशी बोलताना सीईओ खडके म्हणाले, की या अर्थसंकल्पात प्रामुख्याने गृह प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, रस्ते बांधणी व खुले प्रदर्शन केंद्रासाठीही मोठा निधी देण्यात आला आहे. शिवाय, महापालिकेकडे रस्ते बांधणी, जलकुंभ बांधण्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. प्राधिकरणातील विविध जागांवर शहरी वनीकरण व बागांसाठी अर्थसंकल्पात साडेपाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, खुले प्रदर्शन केंद्रासाठी 44.35 कोटींची तरतूद आहे. प्राधिकरणाने ई-गर्व्हनन्सवर भर दिला असून, त्यासाठी अर्थसंकल्पात 2.75 कोटींची तरतूद केली असल्याचेही खडके म्हणाले.

ठळक तरतुदी
– 561.03 : कोटींची एकूण अर्थसंकल्प
– 213 : कोटी नवीन सदनिका बांधणीसाठी खर्च करणार
– 44.35 : कोटी खुले प्रदर्शन केंद्रासाठी
– 031 : कोटी रस्ते बांधणीसाठी
– 5.50 : कोटी शहरी वनीकरण, बागांसाठी खर्च करणार
– 02.75 : कोटी ई-गर्व्हनन्ससाठी