अडीच-अडीच वर्षे महापौरपद घ्या – आठवले

0

मुंबई : मुंबई महापालिकेत सत्तेचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन अडीच-अडीच वर्ष महापौर पद वाटून घ्यावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी केले. भाजपा शिवसेनेला मुंबईत प्रचंड यश मिळाले. मात्र, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सरकार स्थापण्याचा तिढा निर्माण झाला आहे. मुंबईत शिवसेना व भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे असाच कौल जनतेने दिला आहे. या जनभावनेची कदर करून भाजपा आणि शिवसेनेने एकत्र यावे. शिवसेनेने काँग्रेसचे समर्थन घेऊ नये. त्यांनी भाजपाचे समर्थन घ्यावे. दोन्ही पक्षाने एकत्र येऊन पहिला महापौर कुणाचा, हे ठरवावे, असेही ते म्हणाले.

रिपाइंचा एकही उमेदवार निवडून आला नसल्याने उपमहापौर पदाचा प्रश्न उपस्थित होत नाही. मात्र, रिपाइंला सत्तेतील अन्य पदे मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.