नवापूरजवळील रस्ता लुटीच्या गुन्ह्याची उकल ; एक कोटी 22 लाख जप्त
नवापूर- सिनेस्टाईल चारचाकीला ओव्हरटेक करीत रस्त्यात वाहन आडवे लावून बंदुकीच्या धाकावर व्यापार्यांकडील दोन कोटी 41 लाख 50 हजारांची रक्कम लुटल्याची घटना नवापूर शहराजवळ गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडी होती. दरोडेखोरांनी लूट केल्यानंतर दोन व्यापारी आणि गाडीचालकाचे कपडे काढून घेऊन त्यांना विवस्र केल्याने दरोडेखोरांचा प्रतिकार करता आला नाही मात्र महाराष्ट्र व गुजरात पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पाच दरोडेखोरांना 24 तासांच्या आत गुजरातमधून अटक केली. पाच आरोपींकडून लुटीचे एक कोटी 22 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. सहावा आरोपी 90 लाख रुपये घेऊन पसार झाला आहे. आरोपींकडून एक पिस्तूल, एक एअरगन आणि 3 चाकू जप्त करण्यात आले आहेत.
या आरोपींना केली अटक
राजेश कानजी पटेल (रा.लखपत,कच्छ) अमरसा चैनाजी ठाकूर ( मधपुरा,मेहसाणा), अक्षय शैलेश पटेल (रा.मेहसाणा), प्रकाश शांतीलाल पटेल (रा.कनसरा,शितपूर) तसेच दीपकुमार हसमुखभाई पटेल (रा. उमजा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मेहुलभाई पटेल हे चालक शैलेश व्दारकाभाई पटेल (38) टाटा सफारी गाडीने जळगाव येथील बालाजी एन्टरप्रायजेसची ही रक्कम अहमदाबादमधील व्यापारी कमलेशभाई रजनीभाई यांना देण्यासाठी जात असताना नवापूर शहरापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर सफारी गाडी आली असताना अचानक एक इनोव्हा (क्र. जी.जे.05 सी.एल.2243) गाडीने सफारी गाडीला ओव्हरटेक करुन गाडी आडवी लावली. सफारीचालकाने तत्काळ गाडी थांबवताच इनोव्हामधील सहापैकी तीन लुटारू बंदूक, चाकू घेऊन गाडीतून उतरले. सफारी गाडीतील चालक शैलेश पटेल यांच्या डोक्यावर बंदूक व दोघांना चाकूचा धाक दाखवला व त्याला गाडी चालवण्यासाठी धमकावले. गाडी पुढे जाऊन थांबवली. त्यानंतर सीटखाली ठेवलेले पैसे काढण्यास सांगितले. पैसे काढून घेतल्यानंतर गाडी चरममाळ घाटकडून वार्सा फाट्यानजीक असताना दोन्ही व्यापारी आणि चालकाच्या अंगावरील कपडे काढून घेत पोबारा केला.