देहुरोड : पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 67 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (दि. 29) रात्री साडेनऊच्या सुमारास सुदुंबरे येथे घडली. राजू सीताराम दरवडे (वय 40, रा. कान्हेवाडी, पो. इंदोरी, ता. खेड) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदुंबरे गावात बाबाजी गाडे यांच्या शेतात पत्र्याचे शेड आहे. फिर्यादी राजू बाबाजी गाडे यांच्या शेतात गेले होते. त्यावेळी अज्ञात आठ ते दहा जण अचानक पत्र्याच्या शेडमध्ये आले. त्यातील तिघांनी पिस्तूल काढले. त्यातील एकाने दोन गोळ्या झाडल्या. काहींनी कोयत्याचा धाक दाखवून राजू आणि त्यांच्या मित्राला धमकावले. आरोपींनी राजू यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, एक लाख रुपये रोख, तसेच राजू यांचे मित्र राहुल येवले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि एक लाख रुपये रोख, मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने तपास करीत आहेत.