जळगाव। थकबाकीदार शेतकर्यांना दहा हजार रुपयांपर्यंतची कर्जरूपी मदत देण्याचे शासनाने जाहीर केल्यानुसार जिल्ह्यातील अडीच लाखांवर थकबाकीदार शेतकर्यांपैकी जामनेर, यावल येथील केवळ दोनच शेतकर्यांना हे कर्ज आतापर्यंत मिळाले. आता शेतकर्यांनी हे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करावेत. त्यानंतर कर्ज नाकारणार्या बँकांच्या तक्रारी कराव्यात, असे आवाहन सहकार विभागातर्फे शेतकर्यांना करण्यात आले आहे. शासनाने जून 2016 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकर्यांना कर्जमाफी जाहीर करताना दहा हजार रुपयांपर्यंत कर्जरूपी मदत देण्याचेही जाहीर केले होते. शासन आदेश असतानाही बँकांनी हे कर्जवाटप करण्यास असमर्थता दर्शवली होती. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश मिळाल्याशिवाय दहा हजारांचे कर्ज वाटप करणार नसल्याची भूमिका बँकांनी घेतली होती. नंतर वरिष्ठ कार्यालयांनी कर्जवाटपास परवानगी दिल्यानंतरही हे कर्जवाटप करण्यात आले नाही.
पालकमंत्र्यांचे आवाहन
या कर्जाची हमी घेण्याचेही शासनाने जाहीर केल्यानंतरही शेतकर्यांना कर्ज वाटप झाले नाही. खरीप हंगामासाठी ही कर्जरूपी मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. शेतकर्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये दहा हजार रूपयांचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज करावेत. बँकांनी कर्ज नाकारल्यास जिल्हा उपनिबंधक सहायक निबंधक कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकर्यांना केले आहे.
अडीच लाख शेतकर्यांना लाभ
या योजनेचा लाभ राज्यातील 89 लाख शेतकर्यांना होणार असून यासाठी राज्य शासन 34 हजार कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे. जिल्ह्यात या योजनेचा लाभ अडीच लाख शेतकर्यांना होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके आदी उपस्थित होते.