पिंपरी-चिंचवड : वय वर्ष अवघे अडीच. मात्र, स्मरणशक्ती एखाद्या तरुणालाही लाजवणारी. याच स्मरणशक्तीच्या जोरावर ‘अवीर’ याने एका दिवसात सहा वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर नोंदवून घेतले आहेत. हा चिमुकला अवीर अवघ्या अडीच मिनिटात जगातील 208 देशांची नावे सांगतो. कुणालाही विश्वास बसणार नाही, असा विक्रम या चिमुकल्याने केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रिंकू जाधव व प्रदीप जाधव या दाम्पत्याचा मुलगा असलेल्या अवीरने ही कमाल केली आहे. त्याच्या विक्रमाची दखल घेत, महापालिकेतर्फे त्याचा गौरव करण्यात आला. अनेक राजकीय नेत्यांनीही त्याचे कौतूक केले आहे.
15 दिवसात जगाचा नकाशा तोंडपाठ!
चिमुकल्या अवीरने वयाच्या अवघ्या अकराव्या महिन्यापासून रंग ओळखायला सुरुवात केली होती. त्याची स्वारी इथेच थांबली नाही. तर भारत देश, त्यातील राज्यदेखील तो ओळखायला लागला. अवीरची आवड व असामान्य स्मरणशक्ती पाहता आई-बाबांनी त्याच्या कल्पनाशक्तीला चालना द्यायचे ठरवले. त्याने अवघ्या 15 दिवसात जगाचा नकाशा तोंडपाठ केला. आज अवीरने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहा विक्रम आपल्या नावावर नोंदवले. यामध्ये अवघ्या दोन मिनिटे 55 सेकंदात 208 देशांची नावे सांगणे, जगाच्या नकाशावर अचूक देश ओळखणे, नावाशिवाय देशांच्या सीमांवरून देशांची ओळख सांगणे, देशांच्या नावासह देशाची राजधानी, भाषा, झेंडा व राष्ट्रीय प्राणी सांगणे अशा विक्रमांचा त्यात समावेश आहे.
पालकांचे नेहमी प्रोत्साहन
अवीरचे आई-वडील दोघेही अभियंता असून त्यांनी मुलाची आवड लक्षात घेत त्याच्यासाठी वेगळा वेळ देणे, त्याच्या छंदाला आवश्यक असणारी साधने पुरविणे, याची काळजी घेतली. त्यामुळे अवीर अगदी पहिल्या वर्षापासून जगाच्या नकाशात चांगलाच रमला. त्याच्या पालकांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठीही अर्ज केला आहे. त्यांना खात्री आहे की अवीरचे नाव तेथेही झळकणार आहे.